पुणे – आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे भाजपकडूनही सर्वच मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातही हीच परिस्थिती पहावयास मिळत आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना, भाजपनं जर स्वतंत्र निवडणूक लढवली आणि लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्रित झाली तर या मतदारसंघात नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्रित झाल्या तर मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्यात लढत होईल. मागच्या निवडणुकीत लोकसभेत पराभव झाल्यामुळे लक्ष्मण जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित झाली तर विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेनेकडून नवीन उमेदवाराला संधी दिली जाऊ शकते.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित झाल्या आणि शिवसेना-भाजपनं स्वतंत्र निवडणूक लढवली तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठे फेरबदल होणार असून नवीन चेह-याला संधी दिली जाणार आहे.
COMMENTS