गृहमंत्री सध्या ‘संजय’च्या भूमिकेत

गृहमंत्री सध्या ‘संजय’च्या भूमिकेत

मुंबई: सोशल मिडिया स्टार पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी थेट या मंत्र्याचे नाव घेत आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री सध्या ‘संजय’च्या भूमिकेत गेले आहेत. जे दिसेल ते पाहावे, सहकारी सत्ताधाऱ्यांना कथन करावे आणि त्यांना क्लीनचिट देत पुढे चालावे, असा त्यांचा दिनक्रम आहे, अशी टिका चित्रा वाघ यांनी केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, पूजा चव्हाण प्रकरणात मोबाइलमधील संभाषणाचा मोठा पुरावा समोर आला आहे. त्यात तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला. मग तिने आत्महत्या केल्यावर तिचा मोबाइल ताब्यात घेण्याची सूचना कथित मंत्र्याने अरुण नावाच्या व्यक्तीला दिली. या क्लिप सगळ्यांनी ऐकल्या आहेत. अशावेळी पोलीस आणखी कोणत्या पुराव्याची वाट पाहत आहेत. कदाचित पूजा चव्हाणच्या कुटुंबावर दबाव असू शकेल, पण पोलिसांनी त्यापुढे जाऊन उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर कारवाई करायला हवी. मात्र, या सर्वासाठी राजकीय इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची आहे. हे काम मुख्यमंत्र्यांचे आहे. त्यांनी संबंधितांच्या मुसक्या आवळायला सांगायला हवे. आरोपींच्या मुसक्या आवळायच्या सोडून ते कसली वाट पाहत आहेत?, असा सवालच चित्रा वाघ यांनी केला.

COMMENTS