मुंबई – दोन दिवसांपूर्वी सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ सोडल्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपला राजीनामा दिला आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या पदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला. दरम्यान, आपण आपल्या पदाचा राजीनामा सोपवत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच महिलांचा आवाज बनण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. तसेच काल कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या बैठकीचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या भाजपात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले होते. काल रात्री अखेर त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे वाघ यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सरकारी नोकर असून त्यांना 2016मध्ये लाचलुचपत विभागाने चार लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. या प्रकरणातून ते सहिसलामत सुटावेत यासाठीच चित्रा वाघ या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
COMMENTS