मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. विधानभवनात 5 वाजता या दोघांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे हे माहीत नाही. परंतु आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान राज्यात युतीसाठी भाजपकडून शिवसेनेची मनधरणी केली जात असल्याची माहिती आहे. याबाबतची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही भाजप युतीसाठी सकारात्मक असल्याचं म्हटलं आहे. ‘केंद्रातली एनडीएची आघाडी राज्यात टिकवण्याचा आमचा प्रयत्न असून मित्र पक्षाला सोडून निवडणुका लढवण्याची आम्ही कुठलीही घोषणा केली नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच युतीसाठी चर्चेला कोण जाणार याबाबतचा निर्णय कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल असंही ते म्हणाले आहेत.
त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे आणि यादरम्यान काही ठोस निर्णय घेतला जाणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS