मुंबई – राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात यावा. या ठिकाणी मंजूर झालेला निधी हा घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा यावर जास्तीत जास्त खर्च करावा, असे निर्देश देत राज्यातील सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या सुमारे 99 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे मान्यता दिली.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत टाकळघाट (नागपूर), कपीलधार (बीड), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर (जालना), आमला (अमरावती), श्रीक्षेत्र कोंडेश्वर (अमरावती), संत गाडगे महाराज जन्मभूमी (शेंडगाव, जि. अमरावती) या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मंजुरी देतानाच सिंधुदूर्ग येथे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक तसेच हिंदी पत्रकारितेचे पितामह बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे स्मारक उभारण्यास तत्वत: मंजुरी दिली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार रावसाहेब दानवे, आमदार रवी राणा, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, विकास आराखडा तयार करताना घनकचरा व्यवस्थापनाचा त्यात समावेश आवर्जुन असावा. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देऊन त्याचे पावित्र्य राखावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्रीक्षेत्र विक्तुबाबा देवस्थान, टाकळघाट, जि. नागपूर या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा पाच कोटी रुपयांचा विकास आराखडा मान्य करण्यात आला. श्रीक्षेत्र कपीलधार, जि. बीड (10 कोटी), श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर, राजूर, जि. जालना (24.98 कोटी), श्रीसंत गाडगे महाराजांची कर्मभूमी असलेले आमला व ऋणमोचन, जि. अमरावती (10.20 कोटी), श्रीक्षेत्र कोंडेश्वर, जि. अमरावती (25 कोटी), संत गाडगे महाराजांची जन्मभूमी, शेंडगाव, जि. अमरावती (18.70 कोटी), आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक, सिंधुदूर्ग (4.55 कोटी). या तीर्थक्षेत्र विकासांच्या कामांमध्ये रस्ता, भिंत, सुशोभिकरण, भक्तनिवास, पाणीपुरवठा, अन्नछत्र सभागृह, संरक्षक भिंत, स्वच्छता गृहे, सभामंडप सजावट आदी कामांचा समावेश आहे.
COMMENTS