सातारा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यभरात प्रचारसभा सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांची काल साताऱ्यातील माण मतदारसंघात प्रचारसभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून दुसऱ्या मंत्र्यांची एकप्रकारे अप्रत्यक्ष घोषणा केली आहे. माण खटाव मतदारसंघातील भाजप उमेदवार जयकुमार गोरे यांना निवडून द्या, त्यांना मंत्रिपद देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलं आहे.जयकुमार गोरे यांना जर चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं, तर मी त्यांना मंत्रिपद देईन, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी म्हसवड येथील सभेत दिला आहे.
दरम्यान या मतदारसंघात शिवसेना – भाजपमध्ये मैत्रिपूर्ण लढत होत आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात जयकुमार आणि शेखर गोरे हे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीची चर्चा राज्यभरात सुरु आहे. अशातच आता म्हसवड येथील भाजपच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्रपक्षावर निशाणा साधत, कमळ चिन्हावर मतदान करा असे आवाहन जनतेला केलं आहे.
COMMENTS