मुंबई – विधानसभेचा निकाल लागल्यापासून सर्वांचंच लक्ष सत्तास्थापनेकडे लागलं आहे. परंतु शिवसेना -भाजपमध्ये सुरु असलेल्या मतभेदामुळे सत्तास्थापनेला मुहूर्त मिळत नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर ठरला असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे. 3 नोव्हेंबरला फडणवीसांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा होणार असून दुपारी 3 च्या दरम्यान या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी भाजपने आज विधीमंडळात सर्व नवनिर्वाचित आमदार (105) आणि भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधीमंडळ नेतेपदी निवडीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 11 आमदारांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.
दरम्यान यावेळी भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोनदा केंद्रात आणि राज्यात सरकार आणलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मोठं कार्य आम्ही करू शकलो. त्यामुळे त्यांचेही आभार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे आणि ते लवकरच होईल असही फडणवीस म्हणाले आहेत.
COMMENTS