पालघर – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार लाढत सुरु झाली असल्याचं दिसत आहे. या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत. डहाणूतील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. एकदा उमेदवार पडला की श्रीनिवासला मातोश्रीचं दार बंद होईल, पण आमचे दरवाजे त्याच्यासाठी सदैव खुले असतील असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी दिवंगत खासदार चिंतामण वनगा व जिव्या मसे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ही निवडणूक आली नसती तर आंनद झाला असता, चिंतामण वनगा 9 वेळा निवडणूक लढले होते. त्यांच्या कुटुंबातुन तिकीट देण्याचे ठरविले. तसेच याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी आणि सुभाष देसाईंशी ही बोललो होतो. परंतु पाठीमागे बोलणेच सुरू होते अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
राजेंद्र गावित एक संघर्षातून पुढे आलेले व्यक्तीमत्व आहे. आम्ही त्यांना 2019 ला पालघर विधानसभेसाठी पाहत होतो. पण आता त्यांना वनगा साहेबांचे अपूर्ण काम पूर्ण करायचे आहे. गेल्या तीन वर्षात आपल्या सरकारने या जिल्ह्यात भरीव कामगिरी केली आहे. पेसा कायद्यांची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून टास्क फोर्समुळे या भागात कुपोषण कमी झाले असून सर्व आदिवासी बांधवांचे खावटी कर्ज माफ करणार असल्याचं आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
COMMENTS