मुंबई – अंतर्गत सुरक्षेच्या कारणावरुन विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी संघटनेचे अड्डे नष्ट केले असून कालही सीमेवर काही घटना घडल्या. काहिशी तणावाची स्थिती पहायला मिळत आहे. तसेच भारतीय सैन्य सक्षम असल्याने सीमेवरची सुरक्षा पहायला मिळत आहे. परंतु त्याचबरोबर अंतर्गत सुरक्षा राखणं महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. अधिवेशन संपवण्यामागे काही घाबरून जाण्याचे कारण नाही. केवळ इथे तैनात असलेला पोलीस फोर्स इतरत्र वापरता यावा म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
मुंबई महत्त्वाचे शहर आहे, त्यामुळे इथे जास्त निगराणी राहिली पाहिजे अशी पोलीस दलाची भावना आहे. घाबरून जाण्याची स्थिती नाही, पण अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्त्वाचे असते. अधिवेशन सुरू असताना सहा हजार पोलीस या अधिवेशनाच्या निमित्ताने तैनात असतात. या परिस्थितीत अधिकचं बल मिळालं तर ते पोलिसांना फायदेशीर होईल. त्यामुळेच काल मी एक बैठक बोलवली होती.
त्या बैठकीत राज्याचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, आयबीचे अधिकारी होते. त्यांनी सर्व परिस्थितीची माहिती आम्हाला दिली. त्यामुळे आज आम्ही सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. त्यात आम्ही एकमताने निर्णय घेतला की अधिवेशनात जे पोलीस बल आहे ते इतरत्र काळजी घेण्यसााठी उपलब्ध करून देता येईल. त्यासाठी अधिवेशनाचे कामकाज आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यात सहकार्य केल्याबाबत विरोधी पक्षांचे आभार मानतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS