मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असून विधानसभेची निवडणूक भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांसोबतच लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भाजप, शिवसेना आणि आमचे मित्रपक्ष ही आमची युती अभेद्य आहे. आम्ही युतीसोबतच निवडणुका लढणार आहोत. स्वतंत्र लढायचं आहे, सर्वच्या सर्व जागांवर लढायचं आहेत, अशी कुठेही-कोणाचीही मागणी नाही. लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रित लढलो, विधानसभा निवडणुकीतही आम्ही एकत्रच लढणार आहोत. तसेच राज्यात पुन्हा एकदा युतीचंच सरकार आम्ही निश्चितपणं निवडून आणणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गरवारे क्लब येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांचा भाजपप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
तसेच राज्यात युतीचं सरकार येणार हे महाराष्ट्राच्या जनतेनंही ठरवलं आहे. आता फक्त बहुमताचे कोणते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, हे पाहण आहे. युतीला मोठं जनसमर्थन मिळणार आहे. आम्ही विस्तृत प्रकारे जागांच्या संदर्भातील तडजोड केली आहे. यामध्ये काही जागांची अदलाबदलही होणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS