मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कारण शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली असल्याचं म्हटलं आहे. परंतु युतीमधील सत्तास्थापनेचा हा पहिला अंक असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावते यांनी घेतलेल्या राज्यपालांच्या भेटीचं निमित्त दिवाळी की राजकीय खेळी आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपने 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. त्यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी खल सुरू आहे. युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असेल, यावर दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदावर ठाम असून शिवसेनेनं 50-50 चा फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला आहे. भाजपला मात्र शिवसेनेचा 50-50 चा फॉर्म्युला मान्य नाही. भाजपकडून आमचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे याबाबतही या दोन्ही नेत्यांनी राज्यपालांशी चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS