मुंबई – भीमा कोरेगाव प्रकरणी भिडे आणि एकबोटे यांच्या कारवाईला बगल देण्यासाठीच जिग्नेश मेवाणी आणि खालिदवर कारवाई केली जात असल्याचा आरोप रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते अर्जुन डांगळे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्र्यांसराखं वागा स्वयंसेवकासारखं वागू नका असंही डांगळे यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये ज्याप्रमाणे भाजपचा धोबीपछाड झाला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातही होऊ शकतो अशी भीती मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे ते घाबरत असल्याचं डांगळे यांनी म्हटलं आहे.जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदवर जर सूडभावनेने कारवाई होत असेल तर त्याचा निषेध आहे. आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, भीमा कोरेगावमागे कुठल्या शक्ती आहेत?, कुणाला कसली सल आहे?, कार्यक्रम होऊ नये अशी भावना होती का? या घटनेची मुख्यमंत्र्यांनी नि:पक्षपाती चौकशी करावी असंही डांगळे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्याना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी भाजपअंतर्गत काही राजकारण सुरु आहे का? याची कल्पना नाही. पण पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी या तणावाच्या घटनेबाबत माहीत असूनही त्यांनी मुख्यमंत्र्याना माहिती दिली नाही हे मुख्यमंत्र्यांविरोधात त्यांच्या पक्षांतर्गत षडयंत्र आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे.तसेच आंबेडकरी अस्तित्व आणि अस्मितेला नख लावण्याचा प्रयत्न करू नये हा आमचा मुख्यमंत्र्याना इशारा आहे.जिग्नेश मेवाणी आणि खालिद यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांनी महाराष्ट्रात भाषण का करू नये ? ही तर अघोषित आणीबाणी आहे. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका योग्य होती. त्यांनी उद्रेकाला संघटीत केलं. आंबेडकरी चळवळीला एकाकी करण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला. ऐक्य व्हावं ही अपेक्षा आहे. पण ते जातीपुरते मर्यादित न राहता सर्वसमावेशक असावे असंही अर्जुन डांगळे यांनी म्हटलं आहे.
तसेच आंबेडकरी चळवळीतून आलेल्या आठवलेंना भाजपची साथ परवडणारी नाही. त्यांना फेरविचार करावा लागेल. नाहीतर आठवलेंना निश्चित फटका बसेल. मंत्री पदापेक्षा बाबासाहेबांच्या चळवळीची अस्मिता महत्त्वाची आहे. या चळवळीच्या अस्मितेशी तडजोड कधीही होणार नसल्याचा इशाराही डांगळे यांनी दिला आहे.
COMMENTS