सांगली – आरक्षणाबाबत धनगर समाज आक्रमक झाला असून तीव्र आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. कालच कोल्हापूर आणि सोलापुरात धनगर समाजानं मोर्चा काढला होता. तसेच सरकारनं एसटीमध्ये आरक्षण दिलं नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा धनगर समाजानं दिला आहे. याची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून आरक्षणाबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला धनगर समाजाच्या नेत्यांना बोलावलं असून येत्या 27 तारखेला सह्याद्री अथितिथीगृहात ही बैठक होणार आहे.
दरम्यान 27 तारखेच्या बैठकीत धनगर समाज आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर, 27 तारखेनंतर धनगर समाज आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे धनगर समाजाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS