मुंबई – देहू, आळंदी, पंढरपूर आणि सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सेवाग्राम विकासासाठी 17 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलबद्ध करून देण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी विविध विकासकामे करण्यासाठी देहू, आळंदी व पंढरपूर विकासासाठी 1094 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी 745 कोटी वितरित केले आहेत. त्यापैकी 711 कोटींची कामे झाली असून यावर्षी नव्याने 212 कोटी रुपये वितरित केले जातील, या सर्व विकासकामांना गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सेवाग्राम, पवनार, वरुड या त्रिकोणाचा पूर्ण विकास करण्यासाठी एकूण 170 कोटींचा आराखडा मांडण्यात आला आहे. येथे रस्ते निर्माण, मलनिस्सारण, धाम नदीवर घाट निर्माण, सौरऊर्जा, सुशोभीकरण आदी कामांसाठी नव्याने अतिरीक्त 17 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. सेवाग्राम येथे सुशोभीकरण कामासाठी जेजे आर्टस् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आऊन याठिकाणी चरखा म्युझिअम करण्यात येणार असल्याचे मुख्यत्र्यांनी सांगितले. घाटाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केली.
देहू, आळंदी, पंढरपूर विकासाठी 1094 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून 745 कोटी वितरित झाले असून यावर्षी अजून 212 कोटी रुपये वितरित केली जातील. पालखी मार्गावर शौचालयांची सुविधा, चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिर परिसर सुधारणा, नवीन बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रीटीकरण, त्याचप्रमाणे वारीकाळात शौचालयांची सुविधा होण्यासाठी खासगी मठ व वाड्यामध्ये शौचालय बांधणे, वाळवंट सुधारणा कार्यक्रम, नामदेव स्मारक उभारणी आदी कामांचा आढावा घेण्यात आला.
पालखी तळाच्या ठिकाणी आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी मोबाईल सुरक्षा युनिट नेमण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.पुणे व सोलापूर परिसरात या विकास आराखड्याच्या कामासाठी जमीन संपादनाचे काम तातडीने करावे त्यासाठी 150 कोटी रुपये वितरित केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यावेळी देहू आळंदी परिसरात केली जाणारी कामे, सदुंबरे विकास आराखडा, भंडारा डोंगर विकास आराखड्यातील कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, नागपूरचे विभागीय आयुक्त संजीवकुमार, पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आदींसह संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS