मुंबई – अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. परंतू निवडणुकीच्या तीन दिवस आधीपर्यंत शिवसेनेच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांशी आमच्याशी संपर्क साधला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तसेच शिवसेनेकडून जर प्रस्ताव आला तर त्यांना बिनशर्त पाठींबा द्या असं देखील मी आमच्या नेत्यांना सांगितले होते. परंतु निवडणुकीपूर्वी तीन दिवस आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही. उलट तुम्हीच आमच्या नेत्यांशी बोला आणि आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ असं काही शिवसैनिकांनी सांगितलं असल्याचं स्पष्टीकरणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
दरम्यान नगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यावरुन शिवसेनेनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला आम्ही पाठिंबा द्यायला तयार होतो असं स्पष्टीकरण दिलं आहे.
COMMENTS