मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील कृषिपंपांच्या वीजबिल वसुलीला स्थगिती देण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेत-यांच्या लाँग मार्चनंतर त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यास राज्यसरकारने सुरुवात केली असल्याचं यावरुन दिसून येत आहे. दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांपुढे कृषिपंपांचे अव्वाचे सव्वा वीजबिल आल्याने मोठं संकट कोसळलं होतं. परंतु आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे शेतक-यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून राज्यात भीषण दुष्काळ असल्यामुळे शेतातील कृषिपंप बंद राहिले होते. तरीही विजबील आल्यामुळे वीज वापरलीच नाही तर मग थकबाकी आली कोठून, असा सवालही शेतकरी करत होते. विरोधी पक्षातील आमदारांनीही याबाबत सरकारला जाब विचारला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर कृषिपंपांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान शेतक-यांच्या वीजबिलावरुन विरोधकांनीही आज सभागृहात आवाज उठवला असल्याचं पहावयास मिळालं आहे. राज्यात बेधडकपणे शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. बिल भरलेल्यांचेही ट्रान्सफॉर्मर तोडले जातात. हा अन्याय आहे. लोकांना हजारो रुपयांचे बिल पाठवले जात आहे. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शनही तोडले जाते. सरकारने पावले उचलावीत अन्यथा लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल. असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! #BudgetSession2018 @SunilTatkare @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @Awhadspeaks @shindespeaks @rajeshtope11 pic.twitter.com/JYLr5Tw12P
— NCP (@NCPspeaks) March 22, 2018
तर शेतक-यांच्या विविध मागण्यांवर विधीमंडळाबाहेर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर राज्यातील शेतक-यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
COMMENTS