मुंबई – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती झाली आहे. परंतु काही मतदारसंघात दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संघर्ष कायम असल्याचं दिसत आहे.
जालना मतदारसंघात ही परिस्थिती पहावयास मिळत असून चार वेळा निवडून गेलेल्या भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील संघर्ष कायम असल्याचं दिसत आहे.
जालना लोकसभा मतदारसंघाच्या मैदानातून मी अजून बाहेर पडलो नसल्याचे खोतकर यांनी म्हटले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी दानवे आणि अर्जुन खोतकर एकाच मंचावर आले होते. पण तिथेही अर्जुन खोतकर यांनी आपण जालना लोकसभेच्या मैदानात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली तर याचा फटका आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना बसू शकतो.
याच पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्यावतीने सहकारमंत्री सुभाष देशमुख हे अर्जुन खोतकर यांचे मन वळवण्यासाठी जालन्यात जाणार असल्याचे माहिती आहे. त्यामुळे या मतदारसंघातील शिवसेना-भाजपातील संघर्ष मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर तरी थांबणार का? याबाबतचा सवाल राजकीय वर्तुळात केला जात आहे.
COMMENTS