नाशिक – माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आरोग्य साक्षर करण्याचा शासनाचा मानस असून आपल्या कुटुंब,गांव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांच्या बैठकीत संवाद साधताना बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून पालकमंत्री छगन भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दीघावकर, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महसूल उपायुक्त दीलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील आहेर, नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, मनापाचे कोरोना नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, या मोहिमेतून आपल्याला राज्याचा, जिल्ह्यांचा हेल्थ मॅप तयार करता येणार आहे. विविध माध्यमातून आपण या मोहिमेंतर्गत जनतेपर्यंत पोहचणार आहोत. त्यामुळे सर्वेक्षणासोबतच व्यापक स्वरूपाची जनजागृती आपल्याला करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यांतील स्थानिक कला व कलावंतांचाही सहभाग वाढवावा. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासाठी, गाव, जिल्हा व राज्यासाठी आरोग्यासाठी जे जे काही आवश्यक आणि गरजेचे आहे, ते ते करावे लागणार आहे, मला खात्री आहे प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी यात निश्चितच सहभाग घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हाणाले.
या कालखंडात आपण कोरोनासाठीच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना साधन-सुविधा उपलब्ध करून देत आहोत. परंतु या सर्व सुविधा आपण कुठपर्यंत नेवू शकतो यालाच काही मर्यादा आहेत, त्यामुळेच आपण प्रतिबंधात्मक उपायांसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. काही लोक गृहविलगीकरणातही बाहेर फिरताना दिसून येत आहेत, त्यांनी आपल्या स्वत:सोबत, कुटुंब, समाज यांचीही काळजी घ्यायला हवी. आज या क्षणाला आपले राज्य हे एकमेव राज्य आहे की जे या कोरोनामुक्तीच्या कामाला जनचळवळ बनवते आहे; त्याशिवाय आपण कोरोनामुक्त होवू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही केवळ प्रासंगिक आपत्ती नसून ती येणाऱ्या काळातल्या मोठ्या आपत्तीची नांदी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येणारी आपत्ती व लॉकडाउन टाळायचे असेल तर आपल्याला कोरोना प्रतिबंधात्मक जीवनशैली अंगवळणी पाडून त्या जीवनशैलीच्या अंगिकार करावा लागेल असेही यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले यांनी यावेळी सांगितले.
राज्यात नाशिकचा मृत्युदर सर्वात कमी – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ही ३ हजार ने कमी झाली असून मृत्यदर राज्यात सर्वात कमी म्हणजे १.६ इतका आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास १० असताना तो नाशिक जिल्ह्याचा एकास ३० इतका आहे. स्वॅब तपासणीतही नाशिक ची कामगिरी अत्यंत वेगवान असून औषधे. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी व महापालिकेच्या रूग्णालयांमध्येच त्यांचा जास्तितजास्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांच्यामार्फत औषधसाठ्याची, किमतीची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात २४ ते २८ मे.टन इतका ऑक्सिजन गरजेचा असून नाशिक जिल्ह्यातील मात्र स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून त्याची दररोज ५५ मे. टन इतकी निर्मिती केली जात आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही, तो पुरेसा उपलब्ध आहे, असे सांगून यावेळी पालकमंत्री भुजबळ म्हणाले, नाशिक शहरात ठक्कर डोमच्या माध्यमातून आदर्श कोविड सेंटरची संकल्पना तर राबवली जाते आहे. याशिवाय शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय् यांच्या संकल्पनेतून पोलीस व त्यांच्या कुटुबियांसाठी १०० बेडचे ऑक्सिजनच्या सुविधांनीयुक्त असे स्वतंत्र कोविड सेंटर निर्माण करण्यात आले आहे. या दोन्ही कोविड सेंटरमध्ये आज रूग्ण उपचार घेत आहेत. नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत पुरेसे बेड रुग्णांसाठी आज उपलब्ध असून भविष्यात बेड कमी पडणार नाही त्यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करण्यात येत असून २५ ते ३० ऑक्सिजन बेड प्रत्येक तालुकास्तरावर उपलब्ध करून दिले आहेत. आज संपूर्ण नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातून येणारे पेशंट नाशिक शहरात उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी आपापली कर्तव्ये अत्यंत जबाबदारीने पार पाडत असून समाजाप्रती ते आपले कुटुंब म्हणूनच जबाबदारीने वागत आहेत असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती सादर करताना सांगितले की, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सुरू होण्यापूर्वीपासून मार्च महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील मोहिम सुरू असून त्याच्या परिणामस्वरूप आम्ही जिल्ह्यातील रूग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात यशस्वी झालो आहोत. आज क्षणाला जिल्ह्याचा मृत्युदर १.६ तर रिकव्हरी होण्याचा दर जिल्ह्याचा ८७ इतका आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत आम्हाला ७३ लाख इतक्या लोकसंख्येपर्यंत पोहोचायचे आहे, आत्तापर्यंत आम्ही २० लाख लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. जिल्ह्यात त्यासाठी ३ हजार २८९ टीम्स् कार्यरत आहेत. या माध्यमातून आपण ६९ कोमार्बिड रूग्णांन शोधण्यात यशस्वी झालो आहोत, त्यातील १ हजार २१४ रूग्णांन शोधून त्यांच्यापासून होणारा फैलाव रोखू शकलो हे या सर्वेक्षणाचे यश आहे. येणाऱ्या काळात उर्वरीत लोकांपर्यंत आम्ही पोहचणार आहोत. दिवसेंदिवस बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून रूग्णसंख्याही कमीकमी होत चालली असल्याचं ते म्हणालेत.
COMMENTS