मुंबई – राज्यात मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा दिवसांत पाच खटले मागे घेतले आहेत. यामध्ये आरे वृक्षतोडप्रकरणातील आंदोलन, नाणार प्रकल्पाविरोधातील आंदोलन, भीमा कोरेगांव हिंसाचारप्रकरणातील आणि आता मराठा आंदोलनातील काही खटले मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले जवळपास 288 खटले रद्द करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. सरकारच्या या निर्णयाचा मराठा समाजाकील 3 हजार तरुणांना फायदा होणार आहे.
दरम्यान हे खटले मागे घेण्यासाठी सरकारने जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस आयुक्त यांच्यामार्फत स्थानिक कोर्टांकडे शिफारस पाठवली आहे. आता यावर कोर्ट काय निर्णय घेते त्यावर सरकारच्या निर्णयाचे यश अवलंबून आहे. तसेच
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार मराठा आंदोलनाशी संबंधीत 35 खटले मागे घेतले जाऊ शकत नाहीत. कारण यामध्ये आंदोलनादरम्यान 5 लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये पोलीस आणि सरकारी कर्मचारी जखमी झाले होते. त्यामुळे आता सरकारच्या या निर्णयानंतर कोर्ट काय निकाल देणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS