मुंबई : कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी दिले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत.
कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.
तसेच लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील, तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक आणि आवश्यक कारवाई केलीच पाहिजे.कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. सर्व काही व्यवहार सुरु झाले आहेत. निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत. परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत. जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा. ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत. त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे. गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा.
COMMENTS