भंडारा – भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणूकीमध्ये गोंदिया विधानसभा क्षेत्रातील 35 ठिकाणी फेरमतदान घेण्याचे वृत्त काही वाहिन्यावर प्रसारित झाले आहे. असा कुठलाही निर्णय निवडणूक आयोगाने घेतला नसून लोकसभा मतदारसंघातील कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान रद्द झाले नाही. तसेच नव्याने मतदान घेण्यात येणार नाही. सहाय्यक निवडणूक अधिकारी गोंदिया विधानसभा यांना निवडणूक रद्द करणे किंवा फेरमतदान घेणे यासंबंधीचा अधिकार नाही, असे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले. आपण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत वळसकर यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली असून असा कुठलाही निर्णय घेतला नाही अशी माहिती उपविभागीय अधिकारी अनंत वळसकर यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आज काही मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याची माहिती संबंधित केंद्राध्यक्षांकडून प्राप्त झाली मात्र कुठल्याही केंद्रावर मतदान रद्द झाले नाही असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान यंत्र तात्काळ दुरुस्तीची कार्यवाही सुरु असून नागरिकांनी पॅनिक न होता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता आपला मतदानाचा हक्क बजावावा. तांत्रिक बिघाडामुळे थोडा वेळ लागेल मात्र मतदारास मतदानापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मतदान केंद्रात येणाऱ्या शेवटच्या व्यक्तीला मतदान करण्याची संधी देण्यात येईल.
व्हिव्हिपॅटमध्ये वापरण्यात येणाऱ्या थर्मोसेंसेटिव्ह पेपरमुळे अडथळे आले असले तरी मतदार यंत्र दुरुस्त करणे किंवा बदलण्याची प्रक्रिया तात्काळ स्वरुपाने निवडणूक आयोगाचे इंजिनियर करीत आहेत. सर्वांना मतदान करु दिले जाणार असून नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क पार पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी केले.
COMMENTS