औरंगाबाद – महायुतीच्या नावाखाली मते घेतली आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यामुळे शिवसेनेनं फसवणूक केली असल्याची तक्रार, रत्नाकर भीमराव चौरे यांनी पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांची नावं आहेत. औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महासेनाआघाडी करुन, सत्तास्थापन्याच्या वाटाघाटी सुरु केल्या आहेत. यावर तक्रारदाराने आक्षेप घेतला असून महायुतीच्या नावाखाली मते घेतली, पण काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन शिवसेना आमची फसवणूक करत असल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे.
मी भाजप समर्थक आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेलं मतदान वाया गेलं असल्याचं तक्रारदारानं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सेना-भाजप महायुतीला मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले.परंतु निकालांतर शिवसेनेने भाजपशी युती तोडली त्यामुळे शिवसेनें आमचा फसवणूक केली असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
COMMENTS