मुंबई – काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तसेच विखे पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्य मराठवाड्यातून एक आमदार, पश्चिम महाराष्ट्रातून एक तर मुंबईतून एक आणि आणखी एक आमदार असे चार आमदार राधाकृष्ण विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाणार आहेत. यामध्ये कालिदास कोळबंकर, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार हे आमदार विखे पाटलांसोबत भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर आणखी दोन आमदारांची नावे अजून समजू शकलेली नाहीत.
दरम्यान 1 ते 6 जूनच्या दरम्यान हा भाजप प्रवेश सोहळा होईल आणि त्याचीच गुप्त मीटिंग राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याची माहिती आहे.दोन दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपात जाण्याचे संकेत दिले होते. राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून लवकरच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले. तसेच राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याची भूमिकाही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे सत्तार यांच्यासोबत इतरही तीन आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS