काँग्रेसचा आघाड्यांचा धडाका, आगामी विधानसभेसाठी तीन राज्यात हत्तीवर स्वार !

काँग्रेसचा आघाड्यांचा धडाका, आगामी विधानसभेसाठी तीन राज्यात हत्तीवर स्वार !

कर्नाटक विधानसभेच्या निकालानंतर देशभरात भाजप विरोधी मोट बांधण्यासाठी विरोधी पक्ष सरसावले आहेत. काँग्रेसनं कर्नाटकमध्ये जेडीएससोबत युती करुन त्याची प्रत्यक्ष सुरूवात केली आहे. आता येत्या नोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगड या राज्यात निवडणूक होणार आहे. या तीनही राज्यात काँग्रसनं आघाडी करण्यासाठी चर्चांचं सत्र सुरू केलं आहे. बहुजन समाज पार्टीची या तीनही राज्यात चांगली ताकद आहे. त्यामुळे काँग्रेसनं बसपासोबत चर्चा सुरू केली आहे.

तीनही राज्यातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना स्थानिक बसपा नेत्यांसोबत चर्चा करण्यास सांगण्यात आलं आहे. दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्यानंतर तो काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांना दाखवून त्याला अंतिम स्वरुप दिलं जाणार आहे. बसपानं उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकीमध्ये आपले उमेदवार न उभा करता सपा आणि राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. विरोधकांच्या एकीमुळे उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला.

त्यानंतर उत्तर प्रदेशात आगामी लोकसभेसाठी असेच महाआघाडी बनविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र मायावती यांनी आपल्याला योग्य जागा मिळाल्या तरच आपण महाआघाडीत सामील होऊ अशी भूमिका घेतली होती. तसंच मध्यप्रदेश आणि इतर राज्यात काँग्रेसनं आपल्यासाठी काही जागा सोडाव्या अशी मागणी केली होती. त्यानुसार काँग्रेसनं बसपाशी बोलणी सुरू केली आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मध्यप्रदेशात बसपाला जवळपास 7 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला 33 टक्के मते मिळाली होती. भाजपला 45 टक्के मते मिळाली होती. गेल्या 15 वर्षात अँन्टीइन्कम्बन्सीचा फटका भाजपा बसण्याची शक्यता आहे.

COMMENTS