नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये हंगामी अध्यक्ष निवडण्यावर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातील सद्यस्थिती पाहता एका वरिष्ठ नेत्याकडे हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्याची शक्यता असून हंगामी अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून कॉलेजिअम असणार असून त्यामध्ये काँग्रेसमधील दिग्गज चेहऱ्यांना स्थान देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच यासंदर्भात आज काँग्रेसचे नेते ए.के.अँटोनी राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले तर पक्षात बदल केला जाणार आहे. परंतु राहुल गांधी जर अध्यक्षपदी कायम राहिले, तर कोणताही मोठा बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे मत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे. तसेच लोकसभेसाठी काँग्रेसचे गटनेते कोण असतील याची औपचारिक घोषणा पुढील आठवड्यात करण्यात येणार असून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेत काँग्रेसचे गटनेते म्हणून राहुल गांधी यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. गेल्यावेळी मल्लिकार्जून खरगे हे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते होते. परंतु यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पक्षाला गटनेत्याची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी गटनेते होणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS