घरकुल घोटाळ्याप्रकरणी राज्यातील काँग्रेसच्या माजी मंत्र्याला अटक!

घरकुल घोटाळ्याप्रकरणी राज्यातील काँग्रेसच्या माजी मंत्र्याला अटक!

मुंबई – घरकुल घोटाळ्याप्रकरणी राज्यातील काँग्रेसच्या माजी मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. दोंडाईचा येथील घरकुलात गैरव्यवहार केल्या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कामगार मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना जिल्हा न्यायालयात ताब्यात घेऊन अटक केली आहे. डॉक्टर देशमुख अंतरिम जामीनावर होते. मात्र हा जामीन रद्द झाल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले आहे. तियामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान दोंडाईचा येथील घरकुल गैरव्यवहार प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात केलेल्या याचिकेनुसार माजी मंत्री हेमंत देशमुख, 3 तत्कालीन माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, विक्रम पाटील, गुलाबसिंग सोनवणे, 3 तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ, अमोल बागुल, राजेंद्र शिंदे यांच्यावर 2016 साली दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचा तपास झाल्यानंतर माजी नगरसेवक गिरीधारी रामराख्या यांच्या खात्यात योजनेच्या ठेकेदाराने जवळपास 15 कोटी रुपयांचा व्यवहार केला होता.घरकुल योजना राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हाय पॉवर कमिटीचे हे सदस्य होते. म्हणून त्यांना देखील आरोपी करून जानेवारी महिन्यात अटक करण्यात आली. तेव्हापासून त्यांना कोर्टाने अद्याप जामीन दिलेला नाही, याशिवाय योजनेचे ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख असे एकूण 10 आरोपी करण्यात आले. गिरीधारी रामराख्या यांच्यानंतर माजी मंत्री हेमंत देशमुख यांना अटक झाली असून 3 नगराध्यक्ष , 3 मुख्याधिकारी, ठेकेदार आणि नाजीम शेख हे तात्पुरत्या जामीनावर आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.

COMMENTS