उस्मानाबाद – तुळजापूर मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण पाचव्यांदा रिंगणात उतरले आहेत. सलग चार पंचवार्षिक निवडणुका त्यांनी जिंकल्या असून पाचव्यांदा मैदानात उडी घेतली आहे. वयाची 82 वर्षे पार केल्यानंतरही त्यांचा या मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे. ज्यावेळी ते या मतदारसंघात असतात त्या वेळी आवर्जून तालुक्यातील गावांना गाठीभेटी देतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांचा हा गड ढासळणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप वेगळे लढले होते. तुळजापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सभा घेत आमदार चव्हाण यांच्या विरोधात रान उठवले होते. तरीही आमदार चव्हाण यांच्या गडाला धक्का पोहोचू शकला नाही. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दहा तारखेला सभा होत आहे. शिवाय अन्य नेत्यांचेही या ठिकाणी सभा होत आहेत.
दरम्यान यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडून राणाजगजितसिंह पाटील यांची मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभी राहिली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून अशोक जगदाळे तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून महेंद्र दुर्गुळे रिंगणात आहेत. या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS