इंदापूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेली काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबतचा निर्णय पाटील यांनी घेतला असून त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुंबईत उद्या दुपारी 3 वाजता पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मान्यवर नेत्यांच्या उपस्थित ते भाजपात प्रवेश करणार आहेत.इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपावरून हर्षवर्धन पाटील होते नाराज. इंदापूरच्या गाजलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे भाजप प्रवेशाची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असून इंदापूर विधानसभेची जागा भाजपकडून लढविण्याची शक्यता आहे.
पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते म्हणून पाटील यांची ओळख आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघांचे ते 4 वेळा आमदार होते. सलग 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात 5 वर्षे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर आघाडी शासनात 14 वर्षे मंत्री म्हणून उत्कृष्ठपणे काम केलं आहे. एकूण 6 मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं आहे. तसेच उत्कृष्ठ संसदीय कार्यमंत्री म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळात त्यांचा गौरव करण्यात आला होता.
COMMENTS