मुंबई – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठ अपयश मिळालं. राज्यात काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला. या दारुण पराभवानंतर काँग्रेस आता विधानसभेच्या तयारीला लागली आहे. आज काँग्रेसची टिळक भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर पहायला मिळाला असून काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला आहे.आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाही, अशी तक्रार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली आहे. तसेच राष्ट्रवादी भाजपला मदत करते, त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको असा सूर काँग्रेस बैठकीत उमटला आहे. तसेच त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी असाही सूर या बैठकीत पहायला मिळाला. त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादीऐवजी वंचितसोबत आघाडी करणार का याबाबत चर्चा रंगली आहे.
दरम्यान काँग्रसची आजची बैठक वादळी ठरली असून या बैठकीत काँग्रेसला धक्का बसला आहे. नांदेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा आढावा बैठकीतच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्यामुळे खळबळ उडाली आहे. नांदेडमधील लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. राजीनामे स्वीकारून नव्या नियुक्त्या कराव्यात अशी राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
आजच्या बैठकीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला असून या बैठकीला अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील, कृपाशंकर सिंग, बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत विभागावर चर्चा होणार असून प्रत्येक विभातील आमदार, पदाधिकारी यांच्याकडून या बैठकीत आढावा घेतला जात आहे.
COMMENTS