मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील त्या दिवशी आमचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल असे संकेत काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस आणि नगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी दिले आहे. महिला नागवडे या लोकसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु नगरमधून संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांचा प्रवेश थांबला होता. त्यानंतर आता पुन्हा नागवडे या राष्ट्रवादीत येेतील अशी चर्चा रंगली आहे.
दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास अनुराधा नागवडे या इच्छुक आहेत. त्यामुळे
यावेळी नागवडे घराण्यास निश्चितच संधी मिळेल, असा विश्वास नागवडे यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाबाबतही तात्काळ मदत करण्याची
सरकारकडे केली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी जिल्हा परिषद गटातील बेलवंडी, चिंभळा, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव बोडखा, पिसोरे, मढेवडगाव, वांगदरी, हंगेवाडीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पाण्याचे उद्भव पूर्ण कोरडे पडले असून, पाणी कोठून आणायचे व पशुधन कसे जगवायचे ही समस्या निर्माण झाली आहे.
सध्या कुकडीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. बेलवंडी गटातील तलाव व साठवण बंधारे भरून मिळावे. कुकडी कालव्याचे पाणी विसापूर चारीच्या माध्यमातून सोडून जास्तीत जास्त तलाव व साठवण बंधारे भरून देण्याची सूचना तातडीने द्यावी. तसेच फळबागा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत. शेतकऱ्याला मदतीचा हात देण्यासाठी जळालेल्या फळबागांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणीही नागवडे यांनी केली आहे.
COMMENTS