मुंबई – राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
राज्य सरकारने नियोजन नीट केलेलं नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात कागदावर जोरदार नियोजन झालं. मात्र या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. दुष्काळात आचारसंहितेचं बंधन नव्हतंच. या सरकारला निवडणुकीत दुष्काळाकडे बघायला वेळ मिळाला नाही. आज राज्यात जी अवस्था आहे त्याला पूर्ण सरकार जबाबदार असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान दुष्काळ जाहीर करण्याची औपचारिकता मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली, मात्र शेतसारा माफ करणं, विद्यार्थी शुल्क माफ करणं या गोष्टी झालेल्या नाहीत.
राज्यात निम्म्याहून अधिक भागात दुष्काळ आहे.
राज्य सरकारने 28 हजार 524 गावात सुरुवातीला दुष्काळ जाहीर केला.मात्र निवडणुकीच्या काळात सरकारने या गावांना वा-यावर सोडलं. 1 कोटी 33 लाख जनावरं राज्यात आहे. त्यातील केवळ 9 लाख म्हणजे केवळ दहा टक्के जनावरांची सोय झालेली आहे. जलयुक्त शिवारामुळे 16 हजार गावं दुष्काळमुक्त केली असा दावा पंतप्रधानांनी केला होता, मग हा दुष्काळ कसा. आचारसंहितेचं दुष्काळाला वावडं नाही तरीही दुष्काळाची कामं थांबली आहेत. कर्जवाटप प्रक्रिया का होत नाही? इसा सवालही चव्हाण यांनी केला आहे.
दरम्यान या सरकारने जनतेला, जनावरांना वा-यावर सोडलं आहे. आज आम्ही सायंकाळी 5 वाजता राज्यपालांना भेटणार आहोत, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा आणि सरकारला निर्देश द्यावे अशी मागणी करणार आहोत. दुष्काळी भागातील लोकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत आहे. राज्य सरकारने जिरायत शेतीला हेक्टरी 50 हजार तर बागायतीसाठी 1 लाख रुपये मदत जाहीर करावी. बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करायला. हवी.कर्जमाफीची मुदत वाढवली पाहिजे. कर्जाचे पुनर्गठण करावे तसेच विद्यार्थी़चे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावं. या सर्व मागण्यांचे निवेदन आम्ही राज्यपालांना देणार आहोत असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
COMMENTS