मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते शिवसेना-भाजपमध्ये जात आहेत. अशातच काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अनंत गाडगीळ हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. परंतु मी काँग्रेसमध्येच कायम राहणार असून, शिवसेनेत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं गाडगीळ यांनी म्हटलं आहे. काल गाडगीळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही चर्चा रंगली होती. परंतु शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला गाडगीळ यांनी पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान अनंत गाडगीळ यांची विधानपरिषदेची मुदत पुढच्या वर्षी संपत असल्यामुळे आतापासूनच ते शिवसेना प्रवेशाची मोर्चेबांधणी करत असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु त्यांनी मात्र आपण काँग्रेसमध्येच कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. ठाकरे यांना पत्रिका देण्याची राहिली होती. त्यासाठी मी काल मातोश्रीवर त्यांची भेट घेतली. परंतु माध्यमांमध्ये मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त पसरलं आहे. मात्र मी काँग्रेसमध्येच राहणार असून शिवसेनेत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचं गाडगीळ यांनी म्हटलं आहे.
COMMENTS