मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. कारण मुंबईतील काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकरही भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. वडाळ्याचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा असुन कोळंबकर यांनी त्यांच्या कार्यालयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह फोटो असलेला एक बॅनर लावला आहे. या बॅनरमध्ये काँग्रेसचा कोणताही नेता दिसत नसल्यामुळं ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान कोळंबकर यांनी यापूर्वी गणेशोत्सवातही बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले होते. त्यावेळीही ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे कोळंबकर यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS