मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.आमदार पिचड यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या भेटीवेळी नुकतेच भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वैभव पिचडही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
त्यानंतर आता काँग्रेसलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचेही सोलापूरमधील एक आमदार भाजपच्या वाटेवर आहेत. अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबईत येऊन भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरु आहे. तसेच म्हेत्रे यांनी 2 दिवसांपूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना याबाबत कल्पना दिल्याचेही बोलले जात आहे. या बैठकीतूनही त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला जास्तच उधाण आलं आहे. त्यामुळे आजचा दिवस विरोधीपक्षांसाठी चांगलाच अडचणीचा दिवस असल्याचे दिसत आहे.
COMMENTS