नवी दिल्ली – मध्य प्रदेश सरकारचा उद्या शपथविधी होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत काँग्रेसने राज्यपालांना पत्र पाठवलं असून आज सायंकाळी भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे या भेटीनंतर आज संध्याकाळी शपथविधी कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला आणला जाऊ शकतो. याबाबत हायकमांड विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे, तर राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी चुरस पहायला मिळत आहे. परंतु पक्षात गटबाजी रोखण्यासाठी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री हा तोडगा काढला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नावावर सहमती झाली असली तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही राज्यात सरकार नेता निवडीचे अधिकार पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत राहुल गांधी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS