मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. दोन दिवसापूर्वीच यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली होती. परंतु तरीही आघाडीतील तीन जागांवरील तिढा अजून कायम आहे.
नंदुरबार, नगर, औरंगाबाद या तीन जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरु आहे. त्यामुळे या जागांसाठी दोन्ही पक्षामधील नेत्यांची येत्या 15 जानेवारीला दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.
दरम्यान नंदुरबारच्या जागेसाठी राष्ट्रवादी इच्छूक आहे. तर अहमदनगरची राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा काँग्रेसला हवी आहे. ही जागा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने मागितली आहे.
मात्र अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला आहे. तर काँग्रेसच्या कोट्यातील औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. त्याठिकाणी सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावर वरिष्ठ नेते आता काय तोडगा काढणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS