मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावर चर्चा पार पडली. याबाबत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्य घटक राष्ट्रवादीबरोबर 125 जागांची चर्चा झाली आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत. तसेच मुंबईत राष्ट्रवादीला सहा जागा हव्या होत्या, त्या त्यांना देण्यात आल्या असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच वंचितसोबत तीन बैठका झाल्या. वंचितने अट घातली राष्ट्रवादीला बाहेर ठेवून आघाडी करा
मात्र राष्ट्रवादीशिवाय आम्ही आघाडी करू शकत नाही असं वंचितला कळवलं आहे. समाजवादी पक्षाबरोबर बोलणी सुरू आहे, काही जागा त्यांना सोडल्या आहेत, एक-दोन जागांचा तिढा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेना – भाजपाची युती होईल असे वाटते. कारण सत्तेसाठी काहीही सहन करण्याची त्यांची तयारी असल्याचा टोलाही माणिकराव ठाकरे यांनी लगावला आहे.
दरम्यान याबाबत समाजवादी पक्षाचे नेते नेते अबू आझमी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मतांचे विभाजन होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. आज सात जागांची मागणी केली आहे. शिवाजी नगर, भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व, भायखळा या जागा हव्या आहेत. भायखळाची जागा आम्हीही लढणार आणि काँग्रेसही लढणार आहे. एमआयएमबाबत भाजपचा कट आहे, अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन व्हावे म्हणून हे सुरू आहे. मुस्लिम मतं काँग्रेसपासून फोडण्यासाठी भाजपचा कट असून प्रकाश आंबेडकरही या कटात सहभागी असल्याचा आरोप आझमी यांनी केला आहे.
COMMENTS