मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचं जागावाटप निश्चित झालं आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपासाठी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. या चर्चेत मुंबईतल्या जागांववरून दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद झाल्याची माहिती असून मुंबईतलं जागावाटप समसमान पातळीवर व्हावं असं राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीची मुंबईत ताकदच नाही तर अर्ध्या जागा द्यायच्या कशा असा सवाल काँग्रेसने केला असल्याची माहिती आहे.
दरम्यान राष्ट्रवादीने काय प्रस्ताव मांडला हे माहित नाही, काँग्रेस पक्षाची मुंबई क्षेत्रातील विधानसभा आढावा बैठक शुक्रवारी होणार आहे. त्यावेळी चर्चा करू, काँग्रेस पक्षश्रेष्ठी या प्रश्नावर अंतिम निर्णय घेतील असं काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं आहे. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत 37 पैकी 7 जागा काँग्रेस राष्ट्रवादीला दिल्या होत्या. अंतिम जागा वाटप एनसीपी आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठी करतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता याबात या दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS