मराठवाड्यात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या ‘या’ जागांची होणार अदलाबदल ?

मराठवाड्यात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लोकसभेच्या ‘या’ जागांची होणार अदलाबदल ?

आगामी लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा प्राथमिक निर्णय झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेवार आणि कोण कुठल्या जागा लढवणार याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. निवडूण येण्याच्या निकषावर आणि त्यासाठी सक्षम उमेदवार देण्यावर दोन्ही पक्षात चाचपणी सुरू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात लोकसभेच्या एका जागेची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे असलेली परभणीची जागा काग्रेसला देऊन त्याबदल्यात औरंगाबादची जागा राष्ट्रवादी काँग्रेसस्वतःकडे घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ती जागा एकदाही पक्षाला जिंकता आलेली नाही. 2004 मध्ये पहिल्यांदा दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाली. त्यावेळेसपासून ती जागा राष्ट्रवादीकडे आहे. मतदारसंघात चांगली ताकद असतानाही राष्ट्रवादीला ती जागा एकदाही जिंकता आली नाही. आजही परभणी मतदारसंघातील 6 मतदारसंघापैकी 3 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तर इतर तीन मतदारसंघातही पक्षाची ताकद चांगली आहे. मात्र लोकसभेसाठी पक्षाकडे तगडा  आणि संपूर्ण मतदारसंघात प्रभाव असलेला उमेदवार नाही. त्यामुळे ती जागा काँग्रेसला देऊन सुरेश वरपुडकर यांना तिकीट दिले जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वरपुडकरांचा जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. तसंच काही अपवाद वगळता वरपुडकरांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगला सुसंवाद आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणज्ये वरपुडकर लोकसभेवर गेल्यास पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या बाबा जानी दुर्राणी यांना संधी मिळू शकते.

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसची ताकद जास्त आहे. मात्र गेली चार टर्म पक्षाला तिथून विजय मिळवता आला नाही. वेगवेगळे प्रयोग केले तरी पक्षाला तिथून विजश्री मिळवता आला नाही. सध्याच्या घडीला पक्षाकडे तसा तुल्यबळ उमेदवारही नाही. त्यातच शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढणार हे जवळपास निश्चित आहे. शिवसेनेचा उमेदवार ओबीसी असणार आहे. भाजपकडूनही ओबीसी उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे ही जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीला दिल्यास पक्षाकडून विधान परिषदेचे आमदार सतिश चव्हाण किंवा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांना तिकीट दिले जाऊ शकते. भाजप शिवसेनेचे उमेदवार ओबीसी असल्यास राष्ट्रवादीने मराठा उमेदवार दिल्यास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो.

आघाडीच्या या खेळीला उलथवून टाकण्यासाठी एमआयएमकडून वेगळीच खेळी करण्यासाठी प्रय़त्न सुरू आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येते का ते पहावं लागेल. ते म्हणज्ये भारिप बहुजन महासंघासोबत एमआयएम निवडणूकपूर्व युती करण्याची शक्यता आहे. भारिपसोबत युती करुन प्रकाश आंबेडकर यांना इथून उतरवण्याची एमआयमच्या नेत्यांची योजना आहे. मात्र अकोला हा हक्काचा मतदारसंघ सोडून प्रकाश आंबेडकर औरंगाबादमध्ये येणार का हा प्रश्न आहे. तसंच ते एमआयएमच्या नेत्यांची कितीही इच्छा असली तरी त्यांच्यासोबत युती करणार हाही महत्वाचा प्रश्न आहे. एमआयएमची ही चाल यशस्वी झाली नाही तर आघाडीचा उमेदवार मराठा आणि मुस्लिम मतांच्या जोरावर इथून बाजी मारु शकतो अशी शक्यता आहे.

COMMENTS