मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जोरदार धक्का बसला असून काही दिग्गज नेत्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक या सगळ्यांचा भाजपा प्रवेश झाला. तसेच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचाही भाजपात प्रवेश केला आहे. तसेच नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी निवडणुकीच्या तोंडावर इतरही नेते भाजपात येतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये येणाय्रा सर्व नेत्यांचे स्वागत केले. महाराष्ट्रातल्या आपल्या कारकिर्दीने आपली वेगळी ओळख निर्माण केली असे दिग्गज लोक भाजपाच्या परिवारात आले याचा मनस्वी आनंद होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ अनुभव असलेले मधुकर पिचड भाजपात आले हे महत्त्वाचे आहे. तसेच शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत ते भाजपात येणे ही आनंदाची बाब असून कालिदास कोळंबकर हे लोकांमधून आलेले नेते असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केलं जातं असल्याचा आरोप आमच्यावर केला जात आहे परंतु त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही जेव्हा शिवसेनेतून गणेश नाईक, छगन भुजबळ यांना फोडले त्यांना अशीच धमकी दिली होती का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना केला आहे.
COMMENTS