आघाडीच्या नेत्यांना खासदारकी म्हणज्ये ओसाडगावची पाटीलकी वाटते का ?

आघाडीच्या नेत्यांना खासदारकी म्हणज्ये ओसाडगावची पाटीलकी वाटते का ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला जात आहे. ते मात्र लढायला तयार नाहीत. राष्ट्रवादीमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, राणा जगजितसिंह पाटील, जयदत्त क्षीरसागर या नेत्यांना शरद पवारांनी सांगूनही लोकसभा निवडणुक लढवण्याला नकार दिल्याची माहिती पक्षाच्या गोटातून सांगितलं जातंय. तर दुसरीकडे अशोक चव्हाण, राजीव सातव, विजय वडेट्टीवार यासारखे काँग्रेस नेतेही निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.

खरंतर नाशिकमधून छगन भुजबळ लढले तर ते जिंकू शकतात अशी चर्चा स्थानिक पातळीवर आहे. तरीही त्यांना निवडणूक लढवायची नाही. पुतणे समिर भुजबळ यांना तिथून उमेदवारी देण्यात आली आहे. समीर निवडून येतील की ही याबाबत साशंकता आहे. छगन भुजबळांना येवल्यातून विधानसभाच लढवायची आहे. कारण काय तर दिल्लीत जाऊन फक्त खासदारकी मिळेल. केंद्रात यूपीएचं सरकार येईल की नाही याची शास्वती नाही आणि आलच तर शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासोबत मंत्रीपद मिळेल की नाही याचीही साशंकता आहे. राज्यात सत्ताबदल होऊ शकतो. आणि त्यानंतर वजनदार आणि मलाईदार खातं मिळू शकतं असा त्यांचा कयास असल्याची चर्चा आहे.

आघाडीच्या इतर बड्या नेत्यांची कमीअधिक प्रमाणात अशीच भावना आहे. त्यामुळेच ते लोकसभा निवडणूक लढवायला नकार देत असल्याचं बोललं जातंय. गणेश नाईकांना ठाण्यातून लढण्चाया आग्रह धरला होता. मात्र ते लढायला तयार नाहीत. जितेंद्र आव्हाडांना कल्याणमधून लढण्यासाठी सांगितलं होतं. त्यांनीही नकार दर्शवला आहे. जयदत्त क्षीरसागरांना बीडमधून लढण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र त्यांनीही नकार दिला. आता तर ते पक्षापासूनही दूर गेले आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादमधून लढण्याचा आग्रह धरला आहे. मात्र ते पत्नीचं नाव पुढे करत आहेत. अशोक चव्हाण हे नांदेडमधून पत्नी अमित चव्हाण यांचं नाव पुढं करत आहेत. प्रत्येकजण स्वतःपुरता विचार करत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक आणि खासदारकी म्हणज्ये या नेत्यांना ओसाडगावची पाटीलकी आहे असं वाटतंय अशी दाट शंका येते.

COMMENTS