मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय शिष्यासाठी राष्ट्रवादीचे तळागाळातील कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. हे राजकीय शिष्य म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे होय. सुशीलकुमार शिंदे हे नेहमीच पवार हे आपले राजकीय गुरु असल्याचे सांगतात. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी आपल्याला शेवटच्या निवडणुकीत साथ द्यावी असं भावनिक साद सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांना घातली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान पवार यांच्या राजकीय शिष्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते नेटाने कामाला लागले आहेत. काँग्रेसच्या तुलनेत शहरात राष्ट्रवादीची संघटनात्मक शक्ती कमी असली तरी प्रचार यंत्रणा काँग्रेस इतकीच प्रभावी ठरत असल्याचं दिसत आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी शरद पवारांनी दोन जाहीर सभा घेतल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत तिरंगी असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेरजेच्या समाजकारणाला प्राधान्य द्यावे, असा कानमंत्र पवारांनी दिला. त्यानुसार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, शहरातील विविध समाज घटकांना शिंदे यांच्यासोबत जोडण्याचे काम करीत आहेत.
शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरुन नगरसेवक रान पेटवित आहेत. तसेच ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील काँग्रेसला मताधिक्य देण्याची पैजही लावली असून त्याची सर्वाधिक चर्चा आहे. मोहोळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसला येथून मताधिक्याची अपेक्षा आहे. मोहिते-पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला फटका बसला असला तरी जुने कार्यकर्ते सक्रिय असल्याचे दिसत आहेत.
COMMENTS