उस्मानाबाद – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार असताना पाचही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना आघाडी मिळाली नाही. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या राजकीय भवितव्याची कसोटी लागली आहे. शिवाय काँग्रेसला सोबत घेतल्याने राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले, तर काँग्रेसचे नेते सोबत असले तरी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नाही. त्यामुळे तेलही गेले अन तुपही अशी अवस्था राष्ट्रवादीची झाली आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उस्मानाबाद, परंडा, बार्शी, तुळजापूर, उमरगा आणि औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहापैकी उस्मानाबाद, परंडा, बार्शी, तुळजापूर आणि औसा येथे आघाडीचे आमदार आहेत. उस्मानाबाद विधानसभेत राणाजगजितसिंह पाटील आमदार आहेत. दोन साखर कारखाने, जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या, एक नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तरीही येथून स्वतः उमेदवार आमदार पाटील आठ हजार मतांनी पिछाडीवर गेले. परंडा विधानसभेत राष्ट्रवादीचे राहुल मोटे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात परंडा शहर वगळता इतर कोठेही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठी आघाडी घेता आलेली नाही. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना तब्बल १९ हजारांचे मताधिक्य मिळाले. बार्शी विधानसभेत राष्ट्रवादीचे दिलीप सोपल आमदार आहेत. त्यांनी मात्र आपला किल्ला फारसा ढासळू दिला नाही. केवळ साडेनऊशे मतांचीच आघाडी सेनेच्या उमेदवाराला मिळाली आहे.
तुळजापूरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण आमदार आहेत. तसे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात फारसे सौख्य नांदत नव्हते. पण, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या खाद्याला खांदा लावून काम केले. संपूर्ण मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोनच पक्ष सध्या ग्रामपंचायत स्तरावर आहेत. त्यामुळे दोघांची कायमच एकमेकांच्या विरोधात असतात.
परिणामी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीसोबत गेले तरी गाव स्तरावरील कार्यकर्ते मात्र एकत्र आले नाहीत. काँग्रेस कार्यकर्त्यांना जवळ केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही नाराज झाले. त्याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीचे असूनही अशोक जगदाळे यांनी सेनेच्या उमेदवाराला उघड सहकार्य केले. परिणामी तुळजापूर मतदारसंघात `तेलही गेले अन तुपही` अशी अवस्था राष्ट्रवादीच्या उमेदवाराची झाली. औसा मतदारसंघात काँग्रेसचे बसवराज पाटील आमदार आहेत. गेल्या वर्षी मोदी लाटेतही त्यांनी बाजी मारली होती. दरम्यान या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकोपा दिसून आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने पिछाडीवर गेला.
COMMENTS