आघाडीच्या जागावाटपाच्या वादावर ‘असा’ निघू शकतो तोडगा ?

आघाडीच्या जागावाटपाच्या वादावर ‘असा’ निघू शकतो तोडगा ?

मुंबई  –  सध्याची देशातली आणि राज्यातली राजकीय परिस्थिती पाहता भाजप विरोधक देशभरात एक  मोठी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यापुढे एकत्रित निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहेत. मात्र सध्या लागलेल्या लोकसभेच्या दोन पोटनिवडणुका आणि विधान परिषदेच्या 6 जागांच्या वाटपावरुन आघाडीमध्ये काहीप्रमाणात का होईना मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत कोण किती जागा लढवणार आणि लोकसभेच्या निवडणुकीत कोण उमेदवार उभे करणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक लागली आहे. गेल्यावेळी दोन्ही पक्ष 3 – 3 जागा लढले होते. यावेळी लातूर – बीड – उस्मानाबाद या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची मते जास्त आहेत. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांना राष्ट्रवादीने ही जागा सोडली होती. मात्र यावेळी दिलीपराव देशमुख निवडणूक लढवण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा सांगितला आहे. तर काँग्रेसला ती जागाव हवी आहे.

लोकसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणुक लागली आहे. गेल्यावेळी एक जागा काँग्रेसने तर दुसरी जागा राष्ट्रवादीने लढवली होती. पालघरची जागा काँग्रेसने लढवली होती. त्यामुळे आता जागा आता काँग्रेसकडे राहणार आहे. या जागेवरुन आघाडीत मतभेद नाहीत. भंडारा गोंदिया ही जागा गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी लढवली होती. त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. तर नाना पटोले यांनी त्यावेळी  भाजपच्या तिकीटीवर निवडणुकीत बाजी मारली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पटोले यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसने त्या जागेवर दावा सांगितला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ती जागा आपल्याकडे राहवी यासाठी प्रय़त्नशील आहे. यावरुन दोन्ही काँग्रेसमध्ये मतभेद उघड झाले आहेत.

दोन्ही ठिकाणी राज्यातल्या नेत्यांना यावर तोडगा काढण्यास अपयश आलं तर हा चेंडू राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्याकडे जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस लातूर – बीड – उस्मानाबाद सह विधान परिषदेच्या 4 जागा लढवू शकते. तर काँग्रेस विधान परिषदेच्या दोन आणि लोकसभेच्या दोन जागा लढवू शकते असा अंदाज आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS