मुंबई – राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा नवा गटनेता कोण असणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.या गटनेत्याची निवड करण्यासाठी येत्या सोमवारी काँग्रेसनं बैठक बोलावली आहे. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाणार असून प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांच्यासाठी राष्ट्रवादीने नगर लोकसभा मतदारसंघाची जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखेंविरोधात टीकास्त्र सोडल्यानंतर विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं होतं.
त्यामुळे राधाकृष्ण विखेही भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. २३ एप्रिलला नगरमध्ये मतदान झाल्यानंतर विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत तर्कवितर्क लावले जात असून सोमवारी होणा-या बैठकीत हे स्पष्ट होणार आहे.
COMMENTS