सरन्यायाधीशाविरोधात महाभियोग आणण्याची काँग्रेसची तयारी !

सरन्यायाधीशाविरोधात महाभियोग आणण्याची काँग्रेसची तयारी !

नवी दिल्ली – सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी काँग्रेसनं सुरु केली असल्याची माहिती आहे. महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी काँग्रेस अन्य विरोधी पक्षांची मदत घेणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ते विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन महाभियोग प्रस्ताव आणण्याबद्दल चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची चर्चा पहिल्यांदा जानेवारी महिन्यात झाली होती. सीपीएमचे सचिव सीताराम येचुरी यांनी सर्वप्रथम याबाबत भाष्य केलं होतं.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर आतापर्यंत 60 पेक्षा अधिक खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यबाबत आझाद हे काँग्रेस, सीपीएम, सीपीआय, एनसीपी, समाजवादी पक्ष आणि बसप या पक्षांमधील खासदारांची भेट घेऊन या प्रस्तावासाठी समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायाधीश चौकशी कायदा, 1968 नुसार न्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभेतील 100 किंवा राज्यसभेतील 50 खासदारांची स्वाक्षरी आवश्यक असते. सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी इतिहासात प्रथमच पत्रकार परिषद घेतल्यानंतर येचुरी यांनी महाभियोग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला होता.

COMMENTS