काँग्रेसच्या तक्रारीनंतर राज्यातील पंतप्रधान मोदींचे ‘ते’ बॅनर्स हटवणार !

काँग्रेसच्या तक्रारीनंतर राज्यातील पंतप्रधान मोदींचे ‘ते’ बॅनर्स हटवणार !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. महाराष्ट्रात 21 तारखेला मतदान घेण्यात येणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच 27 सप्टेंबरपासून उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. नामनिर्देशन पत्राची अंतिम मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच याची छाननी – 5 ऑक्टोबररोजी होणार आहे. तर 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
या.निवडणुकीची घोषणा होताच राज्यात 21 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

परंतु आचारसंहिता लागू होऊनही राज्यातील पंतप्रधान मोदी यांचे बॅनर्स हटवले नसल्याची तक्रार काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर राज्यातील पेट्रोल पंपांवर लागलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर्स हटवले जाणार आहेत. त्याचबरोबर एसटी बस स्थानके, रेल्वे स्थानके, महापालिकांच्या बसेसवरील राज्य शासनाच्या जाहीराती हटवल्या जाणार आहेत. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आह्. बॅनर्स आणि जाहिरात काढण्यासंदर्भात राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी सूचना देखील निवडणूक आयोगानं दिली आहे.

आदर्श आचारसंहितेचे नियम

1) आचारसंहितेच्या काळात कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टरचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. तसंच सरकारी मालमत्ता, सरकारी गेस्ट हाऊसमध्ये हक्कही गाजवता येत नाही.

2) आचारसंहिता मंत्र्यांनाही लागू होते. त्यामुळे या कालावधीत कोणत्याही मंत्र्याला रस्ता, पाणी, वीज अशा विकास कामांची आश्वासनं देता येत नाहीत. तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही.

3) मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना आमिष दाखवणे अशा गोष्टी करण्यात आचारसंहितेच्या कालावधीत मनाई आहे. त्यामुळेच विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामाची घोषणा या काळात करता येत नाही. तसंच योजनांची अमंलबजावणीही बंद ठेवावी लागते.

4) कुठल्याही पक्षाला प्रतिस्पर्धी पक्षाच्या भाषणात, रॅलीत, प्रचारसभेत, मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा अडथळा आणण्यास मज्जाव आहे. त्या उमेदवाराची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून रद्द होऊ शकते.

5) नागरिकांच्या खाजगी मालमत्तेचा किंवा जमिनीचा विनापरवाना वापर कोणत्याही पक्षाला करता येत नाही.

6) कोणताही प्रचार रात्री दहा वाजताच्या आतच संपवणं बंधनकारक आहे. अन्यथा, तो आचारसंहितेचा भंग ठरतो.

7) समाजात जाती, धर्म, वंश, भाषा याआधारे फूट पडेल किंवा वाद निर्माण होतील असं कोणतंही भाषण, प्रचार, घोषणा किंवा आश्वासनं उमेदवार आणि पक्षाने देण्यास मनाई आहे.

COMMENTS