पुणे – पुणे लोकसभा उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती आहे. या मतदारसंघातून काँग्रेसनं
संभाजी ब्रिगडेचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्याचं ठरवलं असल्याची माहिती आहे. प्रवीण गायकवाड यांनी आज मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
दरम्यान गेली काही दिवसांपासून गायकवाड हे काँग्रेसमधून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र त्यांच्या नावाला स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केल्याने गायकवाड यांनीच मला आता काँग्रेसचे तिकिट नको, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला काॅंग्रेसने उत्तर मुंबईची उमेदवारीही दिली. त्यावर गायकवाड यांनी टीका करत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काॅंग्रेस अवहेलना करत असल्याचा टोला लगावला होता.
त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी याची दखल घेत गायकवाड यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तसेच पुण्यातून त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS