मोदी प्रधानमंत्री की प्रचारमंत्री ? – गुलाम नबी आझाद, वाचा समारोप सभेतील नेत्यांची भाषणे !

मोदी प्रधानमंत्री की प्रचारमंत्री ? – गुलाम नबी आझाद, वाचा समारोप सभेतील नेत्यांची भाषणे !

नरेंद्र मोदींना भारतातील सर्वसामान्य जनतेची अजिबात काळजी राहिली नाही. मोदी अधिकाधिक काळ परदेशात असतात. केवळ निवडणूक आली की प्रचारासाठी ते फिरताना दिसतात. हे प्रधानमंत्री नसून प्रचारमंत्री आहेत. मोदी फक्त दोन ते तीन लोकांसाठीच देश चालवत असून भारतात जणू हुकुमशाहीच सुरु झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी लाठ्या काठ्या गोळ्या वापरून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला भाजप इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यांचा दुरुपयोग करून सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली असून लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कोणताही त्याग करायला तयार आहे.

नरेंद्र मोदींचे सरकार धादांत खोटे बोलते आहे त्यांनी शेतकरी विद्यार्थी तरूण महिला व्यापारी यांना खोटे बोलून फसवले. या खोटारड्या सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. युपीए सरकारच्या काळात सर्वात जास्त काम झाले परंतु मोदी खोटे बोलून देशाची दिशाभूल करित आहेत. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे काश्मिरात संपलेला दहशतवाद पुन्हा वाढीस लागला आहे. या सरकारच्या काळात काश्मीरात सर्वात जास्त दहशतवादी हल्ले झाले. मोदींनी देशाला धोका दिला आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

मोदींनी खोटे बोलून देशाचे वाट्टोळे केलेः मल्लिकार्जुन खर्गे

वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचे वाटोळे केल्याचा आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. हे सरकार नोटाबंदीवर खोटे बोलले. मोदींच्या या निर्णयामुळे लाखो लोकांच्या नोक-या गेल्या. नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही उलटपक्षी महागाई प्रचंड वाढली. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व करांच्या बोझ्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहे यातून मिळणारा पैसा मोदींनी आपल्या मित्रांच्या खिशात घातला. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचले नाही तर अधिक बुरे दिन येतील. हे सरकार संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय संपवण्याचा प्रयत्न करित असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकांना मोदी फडणवीसांचे भाषण नको राशन पाहिजेः खा. अशोक चव्हाण

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जनसघंर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाची माहिती देऊन राज्यातील अनेक समस्यांवरून सरकारवर टिकास्त्र सोडले ते म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेने पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमधून सुमारे १२०० किलोमीटरचा प्रवास केला. या यात्रेदरम्यान पश्चिम महाराष्ट्रासारख्या समृध्द भागाची दुरावस्था झाल्याचे दिसून आले. आता काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याची वास्तविकता जनतेने ओळखली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत मात्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. लोकांना भाषण नको  राशन हवे आहे परंतु मोदी फडणवीस भाषणाशिवाय काहीच करत नाहीत. राज्यातील जनता त्रस्त झाली असून निवडणुकीची वाट पाहते आहे. जनसंघर्ष यात्रेतून लोकांचा असंतोष व्यक्त असून ही परिवर्तनाची नांदी आहे.

सनातन व संघाचे मधूर संबंध, मोहन भागवतांनी खुलासा करावा: विखे पाटील

सनातनसारखी कट्टरवादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपले मधूर संबंध असल्याचे सांगते. कदाचित त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करायला राज्य सरकार तयार नाही, असा आरोप करून सरसंघचालक मोहन भागवत यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सनातनशी नेमके काय संबंध आहेत; ते जाहीर करण्याचे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. सनातनचे डॉ. जयंत आठवले यांनी अनेकदा लोकांना नक्षलवादी, दहशतवादी बनण्याचे आवाहन केले आहे. राजकीय नेत्यांना ठार मारण्याची आणि राजकीय व्यवस्था उलथवून लावण्याची भाषा वापरली आहे. यासंदर्भातील त्यांची चिथावणीखोर विधाने त्यांचेच मुखपत्र सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाली आहेत. हा एक ठोस पुरावा असून, पुरोगामी विचारवंतांप्रमाणेच या पुराव्यांच्या आधारे पोलीस डॉ. जयंत आठवले यांना अटक करणार का? असा खडा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

या सभेला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, आ. बसवराज पाटील, आ. सतेज पाटील, आ. भारत भालके, आ. संग्राम थोपटे, आ. जयकुमार गोरे, आ. अनंत गाडगीळ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. डॉ. विश्वजीत कदम, आ. आसिफ शेख, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश  काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागचे अध्यक्ष व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप यांच्यासह काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS