नवी दिल्ली – 2019 मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटत आहेत. काँग्रेसनं या विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जागावाटपावरुन विरोधी आघाडीत मतभेद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यावर मात करण्याचा प्रयत्न महाआघाडीच्या नेत्यांकडून होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी मायावतींनी जागावाटपाबाबत विधान केल होतं. त्यावर वेळप्रसंगी सपा कमी जागा घेईल पण आघाडी तुटु देणार नाही असं वक्तव्य केलं होतं.
आता काँग्रेसनंही ज्या मतदारसंघात पक्षाची ताकद आहे. त्याच मतदारसंघात लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसनं 2014 मध्ये 44 जागा जिंकल्या होत्या. त्या 44 जागा काँग्रेस स्वतःकडे ठेवणार आहेच. त्याचसोबत काँग्रेस 2014 मध्ये 224 जागांवर दुस-या क्रमांकावर होती. त्या जागाही काँग्रेस लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार 268 जागांवर काँग्रेस लढणार असल्याचं बोललं जातंय. यामध्ये काही जागांमध्ये किरकोळ बदल होऊ शकतात असंही सूत्रांनी सांगितलं आहे. काँग्रेसनं याबाबत अंतर्गत सर्व्हे केला आहे.
जास्त जागांचा आग्रह न धरता ज्या जागा निवडणू येण्याची शक्यता आहे. अशाच जागांवर लक्ष केंद्रीत करुन जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. यामुळे महाआघाडीतील इतर पक्षांनाही चांगल्या जागा मिळू शकतात. समाजवादी पार्टीनंतर आता काँग्रेसने जागावाटपात अशी संमजसपणाची भूमिका घेतल्यामुळे जागावाटपावरुन महाआघाडीत मतभेद होणार नाही अशी आशा आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवारही निवडणुकीच्या आधी जाहीर केला जाणार नाही असंही महाआघाडीतील काही नेत्यांनी सांगितलं आहे.
COMMENTS